कैक वर्षापासून चालत आलेल्या आषाढी वारीची परंपरा सलग दुसर्या वर्षी कोरोनामुळे तहकूब करावी लागली. त्यामुळे ’ वारी चुकू दे ना हरी ’असं मागणं मागणार्या विठू भक्तांची यंदाही पार निराशा झाली. ’वारी’ हा महाराष्ट्राचा लोकोत्सव आहे. ज्ञानदेवपूर्व काळापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. विठोबाचं सगुण रूप पाहण्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विठू भक्त मोकळ्या मनाने, निरपेक्ष भावनेने आणि निस्वार्थ वृत्तीने वारीत सहभागी होत असतो. वारीतला हा एकोपा लोकांना परोपकार अन् परमार्थ शिकवतो, समानता शिकवतो, भूतदया शिकवतो. वारीत उराउरी भेटताना जातीपातीची सगळी जळमटे पिकल्या पानासारखी गळून पडतात. मी-तू असा भेदाभेद नष्ट करणारी वारी महाराष्ट्राच्या इतिहासातला अनमोल ठेवा आहे. पण वारी संपल्यावर अन् वारकरी गावी गेल्यावर ’वारीतला संस्कार’ वाढीस लागत नाही. पुन्हा मी-तू असा भेदाभेदाचा अमंगळ जयघोष त्याच्या उराउरात स्पंदू लागतो. जात धर्म वर्चस्वाचा किडा वळवळायला लागतो. त्यातूनच मग दोन जातीतला, दोन धर्मातला, दोन माणसातला संघर्ष सुरू होतो. मग प्रश्न पडतो की, आपण वारीतून काय शिकलो. वारीतला निखळ, निर्मळ अन् शुद्ध आनंद रोजच्या आयुष्यात का भेटत नाही. याचा विचार करायला हवा. वारी आनंदाची, समाधानाची, परिवर्तनाची अन् सामाजिक अभिसरणाची प्रयोगशाळा मानली जाते. या प्रयोगशाळेत अनंत वारकरी मागायला नव्हे आनंद शोधायला जातात. वारकरी विठोबाकडे काही मागत नाही. वारीत नवस नसतो, गुलाल बुक्क्याची उधळण नसते. दोन पैशाचा नारळ घेऊन फोडायची चिंताही नसते. विठोबा आपल्या पदरात काही दान टाकेल, अशी आशाही नसते. पायी जाणं अन् पायी येणं हीच वारीची अट असते. वारीतली समता, वारीतली बंधुता वारीपुरती नव्हे तर आयुष्यभर जपली पाहिजे. पंढरीची वारी ही आयुष्यभराची दैनंदिनी झाली पाहिजे. सोबत कुणी काही आणत नाही अन् सोबत कुणी काही घेऊन जात नाही. म्हणून माणसाला हव्यासाचा अन् मेदाभेदाचा लोभ असू नये. संत नामदेव एके ठिकाणी म्हणतात.
‘अंतकाळी मी परदेशी,
ऐसि जाणोनि मानसि‘
संसारात आपलं म्हणून खरं कोणीच नसते. सगेसोयरेसुध्दा तेवढ्यापुरतेच. अंतकाळी तेसुध्दा पाठमोरे होतात. ’एकलेचि येणे एकलेचि जाणे’ हाच इथला न्याय आहे. तेव्हा ’अंतकाळी मी परदेशी’ ही जाणीव माणसाला होणे फार गरजेचे आहे. हा मानवी देह फार कष्टाने प्राप्त झाला आहे, तेव्हा या देहाचे सोनं व्हावं, हाच सगळ्या संताचा सांगावा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात अठरापगड जातीतल्या संतानी एकत्र येऊन; मानवतेचा जागर वारीच्या रूपाने वृद्धींगत केला. तो वारसा आजही अव्याहतपणे सुरू आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. वारीच्या अखंडित परंपरेचे कौतुक करताना ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे म्हणतात, ’विठू पारंबीला चिकटला. विठू माऊलीचं हे चिकटलेपण दरवर्षीच्या मांदियाळीतून याचि देही याचि डोळा अनुभवता येतं होतं. पण गेली दोन वर्षे हा अनुपम सोहळा कोरोना संसर्गाच्या भितीमुळे आपल्या सर्वांच्या नजरेपासून दूर आहे. मात्र हा पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे‘. यंदाची वारी नेहमीसारखी नाही. म्हणून अनेक भक्तांचा जीव कासावीस झाला असेल. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष, टाळ मृदंगाचा मनमोहक स्वर, दिवेघाटातली चढण – उतरण, वाटेवरच्या गावातला मुक्काम, वाखरीतलं रिंगण अन् माऊलीचा अश्व या सगळ्यापासून यंदाचा वारकरी दूर आहे. पण विठोबाचं ध्यान त्याच्या मनात निरंतर सुरू आहे. तो विटेवर उभा आहे, म्हणून त्याला विठोबा म्हणतात. तो पांढर्या रंगाचं वस्त्र धारण करतो, म्हणून त्याला पांडूरंग म्हणतात. तो कमरेवर हात ठेवून सर्वांकडे समत्वभावाने पाहतो, म्हणून त्याला माऊली म्हणतात. त्याच्या हातात ना शस्त्र आहे, ना अस्त्र आहे, म्हणून त्याला अहिसेंचा पुरस्कर्ता मानतात. विठोबाचं हे रूप भक्तामध्ये समानता पेरतं, अहिंसा वाढवतं. भेदाभेदाची दृष्टी नष्ट करतं. काळा-गोरा, गरीब-श्रीमंत, लहान-थोर, श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेद विठोबाच्या दारात अन् वारीत अमान्य आहे. ’माझ्याकडे पाहा अन् माझ्यासारखं राहा’ हा त्याचा नेहमीचा सांगावा यावर्षीही वारी शिवाय ऐकावा लागेल. विठोबाचं हे सगुण रूप हजारो वर्षापासून भक्तांना निरंतर आवडत आहे. यातच विठोबाचं मोठेपण आहे. या विठोबाचा शोध गौतम बुद्धांपर्यंत जाऊन पोहचला, तरी त्यांच्या मोठेपणाला खुजेपणा येत नाही. आमच्या नव्या पिढीची कवयित्री कल्पना दुधाळ एके ठिकाणी म्हणते…
कोणत्याही सॅटेलाईट अन् टॉवरपेक्षा तुझ्या कळसानं उभं केलेलं भक्तीचं नेटवर्क
लय भारी विठूराया, वारीचा हा गोडवा अन् मूल्यगाभा पुढच्या वर्षी तरी तुझ्या भक्ताला लाभू दे रे बाबा !
-डॉ. आबासाहेब सरवदे,वीर वाजेकर कॉलेज, फुंडे, ता. उरण