Breaking News

भारत पाचव्यांदा जगज्जेता; अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडवर मात

अँटिग्वा ः वृत्तसंस्था

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला चार गड्यांनी पराभतू करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर 19 विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट मार्‍यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूने 95 धावांची झुंज दिली. भारताच्या बावाने पाच बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले, पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला, तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. इंग्लंडच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ बॉयडेनने सलामीवीर फवंदाज अंगक्रिश रघुवंशीला शून्यावर बाद केले. त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीदने 49 धावांची भागीदारी केली. थॉमस ऍस्पिनवॉलने (21) हरनूरला बाद करीत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मागील सामन्यात शतक झळकाविलेला कप्तान यश धुलसह रशीदने धावफलक हलता ठेवला. रशीदने अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना इंग्लंडने सामन्यात रंगत निर्माण केली. भारताने शतकाचा पल्ला ओलांडण्यापूर्वी जेम्स सीलने यश आणि रशीदला झेलबाद केले. रशीदने सहा चौकारांसह 50, तर यशने 17 धावा केल्या. या पडझडीनंतर राज बावा आणि निशांत सिंधू यांनी डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करत दबाव कमी केला. विजयासाठी 25 धावा असताना बावा (35) बाद झाला. त्यानंतर आलेल्या कौशल तांबेलाही इंग्लंडच्या ऍस्पिनवॉलने झेलबाद करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 176 धावांवर भारताचे 6 फलंदाज माघारी परतले, मात्र निशांत सिंधूने अर्धशतक झळकावत भारताला विजयाजवळ पोहचवले. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बानाने 48व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला जगज्जेता बनवले. निशांतने पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 50 धावांची खेळी केली, तर बाना 13 धावांवर नाबाद राहिला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply