Breaking News

संपूर्ण नवी मुंबईवर सीसीटीव्हीची नजर

 महापालिकेकडून 1500 कॅमेरे बसविले जाणार; सर्वेक्षण पूर्ण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईचा वाढता विस्तार व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. पोलिसांसमवेत साईड सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था, अपात्कालीन घटना याबाबत प्रशासनाला तातडीने माहिती मिळून कार्यवाही करता येणार आहे. सध्या शहरात 282 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु शहरातील सर्वच विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक पद्धतीने शहर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीतील वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यांवर पालिकेने 2012 रोजी 282 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. आता शहरात 1500 अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणार्‍या ऐरोली-मुलुंड उड्डाणपूल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोलनाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारांवर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहे. शहराच्या प्रत्येक प्रवेश-निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणार्‍या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने नंबर प्लेट वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील 27 मुख्य चौकांसाठी 108 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील 43 ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा नऊ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आठ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण काम होणार आहे. शहरात वाहतूक व पोलीस विभागाला या सुविधेचा अत्यंत फायदा होणार आहे.

-पुरुषोत्तम कर्‍हाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply