राज कुंद्राच्या डर्टी पिक्चरची मुंबई पोलिसांनी सांगितली स्टोरी
मुंबई : प्रतिनिधी
पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच राज कुंद्रा यांची कंपनी तरुणींना फसवून त्यांच्याकडून अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पॉर्नोग्राफिक कंटेण्टप्रकरणी क्राईम ब्रांचने फेब्रुवारी 2021 मध्ये मालवणी पोलिस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासात अनेक गोष्टी उघड झाला. सिनेमात काम करणार्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये ब्रेक देऊ, असे आमिष दाखवून ऑडिशन्ससाठी बोलावले जायचे. बोल्ड सीन्स करावे लागतील, असे सुरुवातीला सांगितले जायचे आणि नंतर याचे पर्यावसन सेमी न्यूड आणि नंतर न्यूड सीनमध्ये व्हायचे. याला महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या आणि अशाच काही महिला कलाकारांनी क्राईम ब्रांचकडे येऊन तक्रार केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
क्राईम ब्रांचने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना असताना असे दिसले की महिला कलाकारांकडून तयार केलेल्या क्लिप्स आणि व्हिडिओ काही अॅप्स आणि वेबसाईट्सना विकल्या जात होत्या. याप्रकरणी आधीच आपण काही आरोपींना अटक केली आहे. यातील उमेश कामत नावाचा व्यक्ती हा व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या कंपनीचे भारतातील व्यवहार पाहायचा. राज कुंद्रा यांच्या व्हिआन या कंपनीचं केनरीन नावाच्या कंपनीशी साटंलोटे होते. ही केनरीन कंपनीही कुंद्रा यांच्या नातेवाइकाचीच होती. केनरीन कंपनी जरी लंडनस्थित असली तरी या कंपनीचे अकाऊंटिंग आणि कंटेण्ट तयार करण्याचे काम राज कुंद्राच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधूनच होत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी तपास करत असताना सर्व धागेदोरे सापडले आहेत. राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या ऑफिसमधून सर्व चित्रफिती हाती लागल्या आहेत. त्यामुळे तपासानंतर राज कुंद्रा यांना आपण अटक केली आहे. हॉट शॉट्स या अॅपच्या माध्यमातून हा अश्लील कंटेण्ट विकला जात असे, मात्र याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अॅपल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरने हे हॉट शॉट्स नावाचे अॅप काढून टाकले होते,’ असेही पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत हाती लागलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे मुंबई क्राईम ब्रांचकडून पुढील तपास करण्यात येत आहे.