राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्षांची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावरच निवडणुका लढवेल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे पटोले मंगळवारी
(दि. 20) दिल्लीत होते आणि त्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती पटोलेंनी दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, राज्यात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहे. यापुढील काळात राज्यात पक्षवाढीसाठी काय केले पाहिजे या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार कामाला लागण्याचे आदेश मिळाले आहेत.
विधानसभा, लोकसभा निवडणुकांबाबत तीन वर्षांनंतर हायकमांड निर्णय घेईल, पण पुढील वर्षी होणार्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, असे पटोले म्हणाले. याचसोबत विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर लवकरच राहुल गांधी महाराष्ट्र दौर्यावर येणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली काढणार असल्याचे प्रभारी पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, दै. सामनाच्या अग्रलेखात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती. याबद्दल नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता काँग्रेसला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.