नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा
मुंबई : प्रतिनिधी
सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवेसेना दिला आहे.
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखात काँग्रेस पक्षावर भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, असे सांगतानाच पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय?, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सामना या मुखपत्रावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कारण सामना मी वाचत नाही, अशा शब्दात पटोले यांनी टोला लगावला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतना पटोले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी काय टीका करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल, असा इशारा पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवेसेना दिला आहे.
पटोले पुढे म्हणाले की, आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी कुटुंबावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखेच आहे. जो थुंकेल त्याच्यावरच ती पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही पटोले यांनी पुढे म्हटले आहे.
‘सामना’तून काँग्रेसवर टीका
सामनाच्या अग्रलेखात ’जी-23’ चा उल्लेख करत काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुसीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काँग्रेसमधील धुसफुशीमागे संघ परिवार असावा असे राहुल गांधी यांचे मत असू शकते, असे सांगतानाच काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे आणि त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
प्रियंका गांधी या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात गेल्या तेव्हा लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्या भोवतीही गर्दीचा माहोल बनतो, पण या संघर्षात सातत्य हवे. राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेत्यांनी छातीवर गोळ्या झेलल्याचा उल्लेख तरत काँग्रेस पक्ष हिंमतवाला होता, डरपोक नव्हता असे अग्रलेखात म्हटले आहे. देशभक्तिशी त्यांचे अतूट नाते तेव्हा होतेच, पण तो काँग्रेस पक्ष आज उरलेला नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.