Breaking News

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही!; आमदार पडळकरांनी टीका

पंढरपूर ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीनिमित्त स्वत: कार चालवत पंढरपूरला गेल्यानंतर सत्ताधारी कौतुक होत असताना विरोधक मात्र यावरुन निशाणा साधताना दिसत आहेत. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, असेही ते म्हणाले आहेत. ठाकरे सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केल्याने या आरक्षणाचे वाटोळे झाले आहे. असाच प्रकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचार्‍यांना लागू करण्याससंदर्भात हे सरकार करीत आहे, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत ठाकरे सरकाने ज्या पद्धतीने फक्त तारखावर तारखा मागितल्या आणि नाईलाजास्तव यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाला ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करावे लागले. आज तोच नाकर्तेपणा करीत जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॉरिअर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकाराचे वाटोळे करायला हे ठाकरे सरकार निघालेले आहे, असे आमदार पडळकर म्हणाले आहेत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचार्‍यांसाठी राज्य सरकारला फक्त अमलात आणायची आहे, पण पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करत आहे. शेवटी उच्च न्यायालयाने कडक आदेशाची भूमिका घेत राज्याचे मुख्य सचिव यांना या योजनेवर निर्णय घेत कोर्टात हजर राहायला सांगितले आहे, असे आमदार पडळकर यांनी म्हटले. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलेय. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, अशी टीका या वेळी आमदार पडळकर यांनी केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply