पनवेल ः प्रतिनिधी
रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेला तीन हजार व्हिटीएम आरटी-पीसीआर किट देण्यात आले. याआधीही अँटीजेन आणि आरटी-पीसीआर किट दिले होते आणि यापुढेही वैद्यकीय मदत करण्याचे आश्वासन या वेळी कंपनीच्या अधिकार्यांनी दिले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जाधव यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या या महामारीमध्ये सिप्ला कंपनी पनवेल महापालिकेस विविध प्रकारची वैद्यकीय मदत करीत आहे. कोरोना साथरोगामध्ये नागरिकांना लागण झाली आहे का नाही याचे निदान करण्यासाठी अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी महत्त्वाची असते. सध्या महापालिका कार्यक्षेत्रात चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्यांच्या किटची गरज भासत असून सिप्ला कंपनीच्या वतीने देण्यात आलेले आरटी-पीसीआर किट महापालिकेला कोरोना चाचण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहेत. या वेळी सिप्ला कंपनीचे साईट प्रमुख विजय थानगे, सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जाधव, सिप्ला फाऊंडेशन सीएसआर मॅनेजर सुनील मकरे उपस्थित होते.