Breaking News

खासदार श्रीरंग बारणेंचा झंझावात ; प्रचार दौरे, बैठकांना महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी रविवारी (दि. 31) पनवेल मतदारसंघात विभागवार प्रचार दौरा केला, तसेच बैठका घेतल्या. त्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीच्या खारघर येथील बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार मनोहर भोईर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत, शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपसंघटक कल्पना पाटील, माजी महापौर चारुशीला घरत आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.

खारघरबरोबरच पनवेल परिसरात अन्य ठिकाणीही महायुतीचे प्रचार दौरे आणि बैठका झाल्या.

-कार्यकर्त्यांनो, घरोघरी जाऊन प्रचार करा -आमदार प्रशांत ठाकूर

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, खासदार श्रीरंग बारणे हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जनतेच्या संपर्कात होते व त्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्रातील योजना पनवेल व उरण परिसरात राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन प्रचार करावा. स्थानिक लोकांसह मोठ्या संख्येने बाहेरील राज्यांतील लोकसुद्धा कित्येक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. या सर्वांना आपल्या उमेदवाराची निशाणी धनुष्यबाण आहे, हे समजावून सांगा.

-नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करू या -खासदार श्रीरंग बारणे

देशाचे लोकप्रिय व सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा मावळा दिल्लीत पुन्हा जाईल यात तीळमात्र शंका नसल्याचा दृढ आत्मविश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी खारघर येथील भाषणात व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना देशात राबविल्या. या योजना पनवेल व उरण परिसरात राबविण्याचे कामसुद्धा महायुतीच्या माध्यमातून मी केले आहे. समोरचा उमेदवार हा नवखा असून, फक्त पवार घराणे हे लेबल त्याच्याकडे आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

– आमदार मनोहर भोईर म्हणाले की, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पनवेल उरण, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघांतून मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे. ते येथून एक लाखापेक्षा जास्त मतांचा लीड घेऊन जातील. गेल्या पाच वर्षांत महायुतीने केंद्रातून आणलेला निधी व केलेली विकासकामे या जोरावर बारणेंचा विजय पक्का असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

– शिवसेना संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांनी, एक चांगला खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांना पुन्हा आपल्याला निवडून द्यायचे आहे, असे सांगितले. स्थानिक प्रश्नांबाबत त्यांनी केंद्र सरकारकडे वाचा फोडली असून, पाच वेळा संसदरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांच्या विजयासाठी वातावरण अनुकूल असले, तरी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये, असेही दळवी म्हणाले.

पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्या माध्यमातून अनेक विकासकामे शहर व ग्रामीण परिसरात करण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्या, त्यासुद्धा राबविण्याचे काम सुरू असून, त्याचाही फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना होईल.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply