मुंबई ः प्रतिनिधी
अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचीदेखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून ते राज कुंद्रा याचे नातेवाईक आहेत. सध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. याचदरम्यान पोलिसांनी एक महत्त्वाची माहिती दिली. या प्रकरणात राजची पत्नी शिल्पा शेट्टीचीदेखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता आहे. राजच्या ज्या ज्या कंपन्या आहेत त्यात अभिनेत्री शिल्पासुद्धा भागीदार आहे. त्यामुळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पाचा समावेश आहे का यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज कुंद्रा याच्या जवळपास 23 कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. यात ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीतसुद्धा शिल्पा भागीदार आहे. त्यामुळे या प्रकरणात तिचादेखील सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते आहे. ज्या अॅपच्या माध्यमातून अश्लील क्लिप विकण्याचा प्रकार सुरू होता, अशाच प्रकारचा आणखी एक अॅप ’जेएल 50’ याचे सोशल मीडिया ब्रॅण्डींगदेखील शिल्पाने केले होते. त्यामुळे राजच्या अटकेनंतर तिला चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी अगदी बारकाईने आपला तपास सुरू केला असून अद्याप शिल्पा शेट्टीविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सध्या तरी या प्रकरणात शिल्पाचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही, असेदेखील पोलिसांनी सांगितले आहे तसेच पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.