महाड : प्रतिनिधी
गेली काही वर्षांत महाड आणि पोलादपूर तालुक्यांत दरडी, भूस्खलन आणि पुराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे यंदा तालुका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली असून संभाव्य दरडग्रस्त गावांत संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी हे अधिकारी हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिवर्षी येणारी आपत्कालीन स्थितीवर अभ्यास करीत बदल केला जात असून या वर्षीदेखील प्रशासन गतवर्षाचा अनुभव लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. पावसाळा सुरू झाला असून दरडी आणि पुराची शक्यता लक्षात घेवून स्थानिक नागरिकांचे स्थलांतर करणे, स्थलांतरासाठी निवारा व्यवस्था, शहरात पूरपरिस्थिती उद्भवल्यास लागणारी बचाव यंत्रणा, संपर्क साधनांची उपाययोजना, बोटींची व्यवस्था आदीच्या तयारीबाबत प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी माहिती दिली. महाड मध्ये एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले असून लवकरच हे पथक दाखल होणार अआहे. ऐन पूरपरिस्थितीत दूरध्वनी यंत्रणा कोलमडते. अशा वेळी मोबाईल यंत्रणादेखील काम करत नाही. ते लक्षात घेऊन वॉकी टॉकी व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे.
महाड आणि पोलादपूरमध्ये गेल्या काही वर्षांत दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी दरडी कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. या वर्षी महाड तालुक्यात जवळपास 72 गावांचा समावेश संभाव्य दरडग्रस्त यादीत केला गेला आहे. यामुळे या गावांतील जवळपास पाच हजार 538 कुटुंबाना स्थलांतरित केले जाणार आहे. या स्थलांतरित नागरिकांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था त्या त्या गावात करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार असून पावसाळ्यात नेमून दिलेल्या ठिकाणी या संपर्क अधिकार्यांनी हजर राहणे भाग आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …