Breaking News

कर्जतमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी!

दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत, 2005च्या आठवणी जाग्या

कर्जत : बातमीदार

ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कर्जत तालुका जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या अनेक गावांत महापुराचे पाणी शिरले. तालुक्यातील पाली वसाहत येथे दरड कोसळली तर काही पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा गुरुवारी दुपारी दोन वाजता पूर्ववत झाला. दामत येथे पुलाजवळ चाळ बांधून राहणार्‍या कुटुंबातील दोघे वाहून गेले आहेत. दरम्यान, महापुराचे पाणी बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक वाढून गावागावांत शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असे वेधशाळेने जाहीर केले होते, त्यानुसार कर्जत तालुक्यात 321 मिलिमीटर तर माथेरान येथे 311 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खंडाळा घाटात उगम पावणार्‍या उल्हास नदीचे पाणी मध्यरात्री 12 नंतर वाढण्यास सुरुवात झाली. कर्जत दहिवली येथील पायपूल वजा बंधारा बांधण्यात आल्यानंतर कर्जत शहरात महापूराचे पाणी येत नाही. त्यामुळे निर्धास्त झोपलेल्या शहरातील इंदिरानगर, कोतवालनगर, म्हाडा कॉलनी, महावीर पेठ, अभिनव शाळा परिसर, कचेरी खालील मुद्रे, नानामास्तर आणि समर्थनगर भागाला गुरुवारी पहाटे महापुराच्या पाण्याने वेढा घातला होता. उल्हास नदीवरील दहिवली येथील पूल लागोपाठ दुसर्‍या दिवशी पाण्याखाली गेला असून, गुरुवारी सकाळपर्यंत पुलावरून तब्बल चार ते पाच फूट पाणी वाहत होते.

 उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या वावे, बेडसे, बार्डी, मालवाडी, कोल्हारे, कोल्हारे कातकरीवाडी, धामोते, तळवडे, मालेगाव, हंबरपाडा, बिरदिले या गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. नेरळ – कळंब राज्यमार्गावरील धामोते येथील रस्ता तसेच रेल्वे फाटक येथील रस्ता पाण्याखाली गेला होता. दहिवली भागातून हे पाणी कोदिवले गावाकडे गेल्याने हंबरपाडा सोसायटीपासून दहिवली गावापर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. या पाण्याच्या प्रवाहामुळे बोपेले-तळवडे मार्गावरील कोल्हारे कातकरीवाडी येथील रस्ता वाहून गेला आहे. नदीजवळ असलेल्या बिरडोले गावातील अर्ध्या घरात महापूरचे पाणी शिरले तर नेरळ -कळंब रस्त्यावरील धामोते पूल पाण्याखाली गेला आणि धामोते गावातील 30 घरात पुराचे पाणी शिरले.

नेरळमधील मातोश्री नगरला 20 तास पाण्याच्या वेढा होता, तेथील चंचेचाळ पुन्हा पाण्याखाली गेली होती तर गंगानगरमधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.  राही हॉटेल पार्किंगमधील काही गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. वाल्मिकीनगर भागाला चारही बाजुंनी पाण्याचा वेढा होता, तर राही हॉटेल परिसरातील 100 हुन अधिक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.

माथेरान – नेरळ रस्त्यावर मोठे झाड कोसळले होते. नांगरखिंड येथे झाड रस्त्यात पडले होते, तर संपूर्ण घाट रस्त्यात डोंगरातील दगड येऊन पडले आहेत. मात्र घाट रस्त्यात एकेरी वाहतूक सुरू आहे. कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील  कातकरवाडीमधील 15 घरात पुराचे पाणी शिरले. याच वाडीमधील भगवान घोगरकर यांच्या गोठ्यात पाणी साठून राहिल्याने 12 शेळया मृत झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उमरोली ग्रामपंचायत हद्दीमधील पाली वसाहतीच्या मागे असलेला डोंगर भूस्खलन झाल्याने खचला. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र डोंगराचा भाग दगड- मातीसह खाली येण्याची शक्यता असल्याने प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन दरडीच्या छायेत असलेल्या रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

भिवपुरी रेल्वे स्थानकजवळील डायमंड सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांना बाहेर पडता येत नव्हते. तर स्टेशनकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. पावसाबरोबर सुरू असलेल्या वादळात भिवपुरी स्टेशनजवळील वीजेचा खांब अर्धवट अवस्थेत कोसळला आहे, तो पुन्हा उभा करण्याचे मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू होते. जामरुंग परिसरातील रजपे, टेंभरे गावांना जोडणारा साकव वाहून गेला असून, भालीवडी परिसरातील मालवाडी येथील तीन पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरून  1200 पक्षी मृत झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर दामत येथे रस्त्यावरून पाणी जात होते. दामत येथे नाल्याच्या कडेला असलेल्या चाळीत काही कुटुंबे राहतात. त्यातील मुनियार कुटुंबातील  इब्राहिम मुनियार (वय 46), झोया इब्राहिम मुनियार (वय 6) हे दोघे गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेले. या चाळीपासून अर्ध्या किलोमीटरवर उल्हास नदी असून, नदीने रुद्ररूप धारण केल्याने त्या दोघांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply