नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 19) एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील सूचक वक्तव्य केले.
भारतरत्नसाठी अनेक शिफारशी येत असतात, मात्र सावरकरांना हा पुरस्कार देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्य वेळी भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो, असे केंद्राने स्पष्ट केले. सावरकरांना हा सन्मान देण्याची मागणी बर्याच काळापासून सातत्याने होताना दिसते, मात्र या मागणीला काँग्रेसचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केलेल्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.