Breaking News

ग्रामसेवकाला मारहाणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अलिबाग ः प्रतिनिधी

ग्रामसेवकाला मारहाण करणार्‍या आरोपीला अलिबाग सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. केतन पांडुरग म्हात्रे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 21 जून 2016 रोजी बेलोशीत घडली होती. शेखर बळी बेलोशी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा संपल्यानंतर आरोपी केतन म्हात्रे व महादेव सोनार तिथे आले. या वेळी महादेव सोनार यांचे घरकुलाचे तीन हप्ते जमा न झाल्याबाबत चौकशी सुरू केली. ग्रामसेवक बळी यांनी त्यांना त्याबाबतची माहिती दिली, मात्र या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ग्रामसेवकांना शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी सरपंच, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी बळी यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. थवई यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात झाली. या वेळी सरकारी अभियोक्ता म्हणून अमित देशमुख यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी केतन म्हात्रेला एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडही ठोठावला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply