रत्नागिरी ः प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागांत वरुणराजाने मुक्काम ठोकला असून कोकणात तर पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पूर येऊन दाणादाण उडाली. या ठिकाणी सुमारे पाच हजार जण अडकून पडले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला गुरुवारी (दि. 22) वेढा दिला. बुधवारी रात्रीपासूनच शहराच्या अनेक भागांत पाणी घुसू लागले होते. शहरातील बाजारपेठ तसेच खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी होते. शेकडो घरांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक पाण्यात अडकलेे. 26 जुलै 2005 रोजी झालेल्या पुरापेक्षाही या वेळची परिस्थिती गंभीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. एनडीआरएफच्या तुकड्या पुण्याहून चिपळूणमध्ये दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू झाले. या महापुरात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर परशुराम घाटात दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पाणी साचून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, तर वशिष्ठ नदीपुलाची पातळी धोक्याच्या वर गेल्याने या विभागातील रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …