Breaking News

खोपोली परिसरात पावसाचा धुमाकूळ

रुळांची भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

सोमवारपासून धुवाधार पडणार्‍या पावसाने गुरुवारी (दि. 22) अधिक रौद्ररूप धारण केल्याने खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने खोपोली परिसरात फटकेबाजी सुरु केली. त्याने साखरझोपेत असलेल्या खोपोलीकरांची झोप उडवली.पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या वस्तीत तसेच शहरातील अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. खोपोली शहरातील इंदिरा गांधी चौक, डि. सी. नगर या रस्त्यावर पाणी आल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले व मोठे आर्थिक नुकसान झाले. मुंबई – पुणे जुन्या महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.

लौजी उदय विहारमधील तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये पाणी शिरले होते. बाजारपेठेतील मजेठीया त्यांच्या जुन्या इमारतीची भिंत पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. वीनानगर तसेच शेडवली भागातील सखल भागातील तळमजल्यावर पाणी साचले होते. तेथील अनेक घरात पाणी शिरले होते. नगरपालिका कमचारी, पोलीस तसेच अपघातग्रस्त मदत टीम व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात फिरून नागरिकांना धीर देत होते.

खोपोली – कर्जत रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली स्थानकांदरम्यान मातीचा भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. किमान आठवडा तरी या मार्गावरीळ रेल्वे सेवा सुरू होणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे मुंबई, कल्याणहून येणारे बँक व शासकीय कर्मचारी खोपोलीत येवू शकले नाहीत. त्यामुळे बँक व शासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. त्याप्रमाणे परिसरातील अनेक कारखान्यातील कामगारही कामावर न आल्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाल्याचे माहिती मिळत आहे.

दरम्यान, खोपोली परिसरात गुरुवारी दिवसभर मधूनमधून पावसाच्या मोठमोठ्या सरी कोसळत होत्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली होती.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply