Breaking News

पाली व जांभूळपाडा पूल दुसर्या दिवशीही पाण्याखाली

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यात बुधवारी व गुरुवारी (दि. 22) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण – पाली – खोपोली मार्गावरील पाली व जांभूळपाडा  पुल सलग दुसर्‍या दिवशीही पाण्याखाली गेले होते.

अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी गुरांचे गोठे ढासळले, तर काही ठिकाणी रस्ते खचले, दरडींचा धोकादेखील अनेक घरांना जाणवत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली आहे.जांभुळपाडा गावात नदी काठी असलेल्या काही घरांना पाण्याने वेढा दिला. तसेच पालीतील भाग्यश्री प्लाझाजवळ पुराचे पाणी आले होते. शेती पाण्याखाली गेल्याने पिकांची नासाडी होऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तर पाली आणि बलाप येथील काही घरांना पाण्याने वेढा दिला होता.

अविश्रांत कोसळणार्‍या पावसाने नागरिक हैराण झाले आहेत. सर्वत्र  पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रहदारीचे मुख्य रस्ते बंद झाल्याने नोकरदारांना सक्तीची रजा घ्यावी लागली.

दरम्यान, पाली बसस्थानक आवारातदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने एसटी बसेस येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे नागरिक, प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एरव्ही गजबजलेल्या बाजारपेठेत  शुकशुकाट होता. येथील आगरआळी, सोनारआळी, भोईआळी, बल्लाळेश्वर नगर आदी ठिकाणी रस्त्यावरून पाणी गेले होते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. 

 वाकण फाटा, पाली व जांभुळपाडा अंबा नदी पूल येथे पोलीस तैनात करण्यात आले होते. पुलावरून पाणी गेल्याने वाहनांना प्रवेश नाकारला होता. पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. तालुक्यातील  नांदगाव व शिळोशी येथील पुलावरूनदेखील पाणी गेले होते. येथील टेंबी वसाहतीला पाण्याने वेढा दिला होता. तालुक्यातील विहिरी, नद्या, नाले, तलाव व ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत.

पाण्याचा वाढता वेगवान प्रवाह व संभाव्य धोका पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला व कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले.

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. तसेच नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास जोखीम घेऊन घराबाहेर पडू नये. काही आपत्तीजन्य परिस्थिती असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, सुधागड

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply