माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे महाड पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रविवारी (दि. 1 ऑगस्ट) केले. रायगड जिल्ह्यातील महाड शहरासह परिसरात दि. 22 जुलै रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाड नगरीत सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांमधून व दुकानांमधून शिरून येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यामुळे नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असणार्या माणगाव तालुका पत्रकार संघाने सामाजिक जाणिवेतून महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, बिस्कीट पुडे, आंंघोळ व कपडे धुण्याचे साबण आदी अन्नधान्याच्या किटबरोबरच, बिसलेरी पाण्याच्या बॉटल व कपड्यांचे वाटप केले.
माणगाव तालुका पत्रकार संघ गेली 24 वर्षे समाजात सामाजिक बांधिलकी राखून काम करीत आहे. याच जाणिवेतून पत्रकार संघातर्फे अध्यक्ष सलीम शेख, कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे, ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते, डॉ. आरिफ पागारकर, आजेश नाडकर, उपाध्यक्ष निलेश म्हात्रे, देवयानी मोरे, सचिव सचिन देसाई, प्रवक्ते संतोष गायकवाड, सहसचिव स्वप्ना साळुंके, खजिनदार अॅड. सायली दळवी, सदस्य नरेश पाटील, दीपक दपके आदींनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमाला माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र खाडे यांनी आपली बहीण स्व. कल्याणी शांताराम खाडे यांच्या स्मरणार्थ योगदान दिले. या उपक्रमाबद्दल माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले.