Breaking News

मतदान वाढीसाठी सहकारी संस्था प्रयत्नशील

कर्जत : बातमीदार

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे. सेलिब्रिटीज मतदान करण्याचे आवाहन करीत असून,  दुसरीकडे मतदान का महत्त्वाचे आहे आणि का केले पाहिजे यासाठी जोरदार जनजागृती केली जात आहे, त्यात सहकारी संस्था, सामाजिक संस्था, असोसिएशन यांच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न यशस्वी होतील, असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी व्यक्त केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या 22 लाख 27 हजार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाची यंत्रणा करीत आहे. त्यात सर्व सहा विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या माध्यमातून 29 एप्रिलला होत असलेल्या मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेचे शिक्षक हे मतदारांच्या घरी जाऊन मतदान यंत्रांची माहिती देऊन, मतदान कसे करायचे हे समजून सांगत आहेत. तर निवडणूक विभागाचे क्षेत्रीय अधिकार्‍यांनी मतदारसंघातील दिव्यांग मतदाराच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून आणि पुन्हा घरी सोडण्यासाठी निवडणूक यंत्रणा नियोजन करीत आहे. सहा ठिकाणी सखी मतदान केंद्र उभारली जाणार असून, तेथील सुरक्षेपासून मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापर्यंत सर्व जबाबदारी महिला सांभाळणार आहेत. ‘मतदान करावे‘, असे आवाहन करणारे फलक निवडणूक आयोगाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत असून, या वेळी निवडणूक यंत्रणेने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी वेगळी पद्धती तयार केली आहे.

मावळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था आहेत, त्यांच्या अध्यक्ष आणि सचिव यांचे नावे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी पत्रे पाठविली आहेत. गृहनिर्माण सोसायटीमधील सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आता सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर टाकण्यात आली आहे. तर मेडिकलची दुकाने चालविणारे तसेच खरेदी केलेल्या वस्तूंची बिले अदा करताना त्यावर 29 एप्रिलला मतदानाचे पवित्र कार्य करण्याचे आवाहन छापील स्वरूपात केले गेले आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या स्वरूपातील प्रवासी वाहतुकीच्या तिकिटांवर 29 एप्रिलला मतदान करण्याचे आवाहन असलेला मजकूर छापण्यात आला आहे. डॉक्टर आपल्या पेशंटला औषधांची यादी देतात, त्यावरदेखील शिक्का मारून 29 एप्रिलला आपल्या लोकसभा मतदारसंघात मतदान आहे असे सांगितले जात आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply