दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस
अलिबाग : जिमाका
खर्चाचा दैनंदिन हिशोब न देणार्या रायगड लोकसभा मतदारसंघांतील दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत.
निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब निवडणूक निर्णय अधिकार्यास देणे बंधनकारक आहे. मात्र रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील दोन उमेदवारांनी अद्यापपर्यंत त्यांच्या खर्चाचा कोणताही हिशोब दिलेला नाही तसेच ते खर्च ताळमेळ बैठकांनादेखील उपस्थित राहिलेले नाहीत, त्यामुळे या उमेदवारांना निवडणूक खर्च सनियंत्रण यासंदर्भातील लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951चे कलम 77 व 78 -10 (क) अन्वये तरतुदींचे पालन न केल्यामुळे तसेच निवडणुका घेण्याबाबतचे नियम 1961चे कलम 86 नुसार कार्यवाही न केल्यामुळे नोटीस देण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तटकरे सुनील सखाराम (रा. मु. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा) आणि तटकरे सुनील पांडुरंग (मु. पो. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) या दोन अपक्ष उमेदवारांना ही नोटीस दिली असून, यात असे म्हटले आहे की, 11 एप्रिल व 16 एप्रिल अशा दोन खर्च ताळमेळ बैठकांना अनुपस्थित राहून व कुठलाही निवडणूक विषयक खर्च न देऊन या उमेदवारांनी कायद्याचा भंग केला आहे.
दोन दिवसांत खुलासा न दिल्यास पुढील कडक कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक रिंगणातील 16 पैकी 14 उमेदवारांनी खर्च ताळमेळ बैठकीस उपस्थित राहून त्यांचे खर्च दिले आहेत.