Breaking News

विस्थापितांचे जलदगतीने पुनर्वसन व्हावे

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणी

महाड ः प्रतिनिधी

महाड आणि पोलादपूरमधील आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. आता येथील विस्थापितांचे पुनर्वसन जलदगतीने करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी   विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली. ते शनिवारी (दि. 7) महाड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

रायगड जिल्ह्याला पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शुक्रवारी तिसर्‍यांदा  रायगड जिल्ह्याचा दौरा केला. दरेकर यांनी महाड व पोलादपूरमधील पूरग्रस्त विविध भागांची पाहणी केली आणि आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी आर्थिक मदतही केली.

दरेकर म्हणाले की, आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत करणे, त्यांचे तातडीने पुनर्वसन करणे तसेच इतर व्यवस्था जलदगतीने करणे आवश्यक असून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पुनर्वसनासंदर्भात प्रांत व स्थानिक अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. तळीये येथील पुनर्वसन जसे म्हाडा करणार आहे तसेच येथील करावी, अशी जनतेचीही मागणी आहेे.

10 ते 15 दिवस झाले तरी अद्यापही अनेकांना तातडीची मदत मिळालेली नाही. याबाबत शासकीय पातळीवर तसेच जिल्हाधिकार्‍यांशी बोलून ही मदत कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करू, असेही दरेकर यांनी सांगितले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी आदी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply