श्रीवर्धन : प्रतिनिधी
तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभरात एखाददुसरी पावसाची सर कोसळते. श्रीवर्धन परिसरातील निसर्गसौंदर्य खुलले असून, वातावरणही सुखद आहे. तरीही पर्यटकांनी येथे पाठ फिरविली असल्याने येथील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतातील पिके कुजल्याने शेतकरी चिंतेत होते, मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभरात एखाददुसरी पावसाची सर येते. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे, मात्र पाऊस थांबूनसुद्धा श्रीवर्धन तालुक्यात येण्यास पर्यटक अजूनही तयार नसल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांचे चौकशीसाठी फोन येतात, मात्र ते पूर परिस्थिती कशी आहे? वादळी वातावरण आहे का? याची विचारणा करतात. वृत्त वाहिन्यांवर कोकणातील अतिवृष्टी व महापुराच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. महाड व चिपळूण शहरातील पूरस्थिती, कोसळणार्या दरडीसंदर्भातील वृत्तदेखील दाखविले जात होते. त्याचा पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. वास्तविक कोकणातील पर्यटनस्थळे समुद्रकिनारी आहेत. कितीही पाऊस पडला तरी पाण्याचा तत्काळ निचरा होतो. महाड व चिपळूण ही शहरे कोकणात असली, तरी ती किनारपट्टीपासून 70 ते 80 किलोमीटर सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे घाट माथ्यावरती मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास त्या परिसरातील नद्यांना महापूर येतो व पूरपरिस्थिती उद्भवते. किनारपट्टीच्या भागांमध्ये फक्त चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतरच गंभीर परिस्थिती असते. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सध्या श्रीवर्धन तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागांमध्ये एकदम चांगले आणि सुरक्षित वातावरण असून सर्वत्र हिरवळ पसरली आहे. त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन येथील व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.