कर्जत : बातमीदार
तालुक्यातील आकुर्ले परिसरात तानाजी मालुसरे सिटी (टीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प उभारणार्या गोपी रिसॉर्ट, शेलट्रेक्स हौसिंग कंपनी आणि त्यांच्या 21 संचालकांवर ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपी रिसॉर्ट आणि शेलट्रेक्स हौसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2008 साली आकुर्ले येथील 104 एकर जमिनीवर गोरगरिबांसाठी टीएमसी गृहनिर्माण प्रकल्प उभारणार होते. तेथे घर घेण्यासाठी 2008 ते 2019 या दरम्यान 4157 लोकांनी नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी 135 कोटींची गुंतवणूक केली होती, तर कंपनीने प्रकल्प उभा करण्यासाठी 56 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर 2019 पर्यंत शेलट्रेक्स कंपनीने ती 104 एकर जमीन गहाण ठेवून त्यावर विविध खाजगी वित्तसंस्थांकडून 180 कोटींचे कर्ज उचलले आहे. 2011 ते 2013 या कालावधीत चार मजली बांधकाम असलेल्या 22 इमारती उभ्या केल्या आहेत, परंतु त्यांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याने तेथील 800 फ्लॅटमध्ये केवळ 167 लोक राहायला गेले होते. दरम्यान, तानाजी मालुसरे सिटीमध्ये घर घेण्यासाठी पैसे भरलेल्या 247 ग्राहकांनी अलिबाग येथील ग्राहक संरक्षण कक्षाकडे, तर काही ग्राहकांनी मुंबई हुतात्मा चौक येथील ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती, मात्र 2017 पर्यंत कंपनीने घरांसाठी पैसे भरणार्या कोणत्याही ग्राहकाची रक्कम परत दिली नाही. उलट त्यांच्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र बँकेकडून वसूल केले जात होते. दरम्यान, या ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणी गोपी रिसॉर्ट्स, शेलट्रेक्स कंपनी यांच्यावर, तसेच या कंपन्यांचे संचालक एबॉय मॉरिस, मणी कृष्णन, अरुण आठले, अनिल पांडुरंग काबले, सुनील विश्वनाथ, वीरेंद्र लासकी, कीर्ती मलगौडा, पांडुरंग शिंदे, सुभाष सावंत, अनिल मणी आदी 21 जणांवर मंगळवारी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे. एन. शेख करीत आहेत.
स्वस्तात घर मिळते, म्हणून मी टीएमसी प्रकल्पात दोन घरे बुक केली होती, मात्र आमची सर्वांची फसवणूक झाली होती. आता गुन्हा दाखल झाल्याने न्याय मिळू शकतो, याची खात्री वाटू लागली आहे.
-उदय पाटील, घर गुंतवणूकदार