उरण : प्रतिनिधी
उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना उरण तालुक्यातील चिरनेर-कोप्रोली रस्त्यावरील कोप्रोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याच्या डाव्या बाजूला हेटवणे नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून कोप्रोली व खोपटे या दोन गावांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी दिलेली जोडणी जलवाहिनी फुटली असून, त्यामुळे या जलवाहिनीतून भर रस्त्यावर पाण्याचा उंच फवारा उडत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या जलवाहिनीचे पाणी तात्पुरते बंद करून विनाकारण वाया जात असलेले पाणी वाचविण्यासाठी कोप्रोली ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्यावरुन ये-जा करणारे पादचारी, वाहनचालक तसेच येथील ग्रामस्थ यांनी केली आहे. पाण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात कित्येक ठिकाणच्या ग्रामीण परिसरात महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे हे पाणी वाया जाऊ नये यासाठी येथील पाणी समितीला तत्काळ फुटलेली पाण्याची जलवाहिनी दुरुस्ती करण्याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती कोप्रोली ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.