आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिडकोला इशारा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रोकार शेड येथे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे तसेच त्या संदर्भातील पत्र सिडकोच्या व्यस्थापकीय संचालकांना दिले आहे.
नवी मुंबईतील बेलापूर-पेंधर मार्गावर धावणार्या मेट्रोचे काम सिडकोने महामेट्रोकडे दिले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पेंधर ते खारघर सेंट्रल पार्कदरम्यान मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोने नवी मुंबई मेट्रो प्रकल्प सुरू करताना स्थानिकांना रोजगार दिले जाईल तसेच नोकरीमध्ये सुशिक्षित प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले जाईल, अशी हमी दिली होती. प्रत्यक्षात मेट्रोच्या कारशेडचे काम पूर्णत्वास आले तरी अद्याप एकही सुशिक्षित बेरोजगाराला नोकरी, रोजगार देण्यात आलेला नाही. म्हणूनच स्थानिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तळोजा येथील मेट्रो कार शेड येथे 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान काही परिस्थिती उद्भवल्यास सिडको प्रशासन जबाबदार असेल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महामेट्रो आणि तळोजा पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.