उरण : वार्ताहर
मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) या जलप्रवासाच्या (लाँच सेवा) भाड्यात सोमवार (दि. 26) मेपासून 18 रुपयांची भाववाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच असुविधा आणि प्रवाशांची असुरक्षितता यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्रास होत असताना मेरीटाईमच्या या प्रवासभाडे वाढीमुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणखी रोडावण्याची शक्यता आहे. सदरची भाड्यातील वाढ 31 ऑगस्टपर्यंत असेल 1 सप्टेंबरपासून पूर्ववत होईल. मोरा ते भाऊचा धक्का या सागरी अंतरास अवघे 40 मिनिटे लागतात त्यासाठी प्रवाशांना एकेरी भाड्यास 73 रुपये मोजावे लागणार आहेत. दरवर्षी ही वाढ 1 जूनपासून केली जाते, परंतु यावर्षी भाववाढ 26 मे पासूनच करण्यात आली असल्याने प्रवासी वर्गात असंतोष पसरला आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या निगराणीखाली ही जलवाहतूक (लाँच सेवा) सुरू आहे, मात्र मेरीटाईम बोर्डाने या आरामदायी आणि उरणकरांसाठी सोयीची असलेल्या या वाहतूक सेवेमध्ये सुधारणा करण्याचे सोडून प्रवासभाडे वाढविल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार (दि. 26) पासून या प्रवासाचे भाडे 55 वरून 73 रुपये केले आहे.