प्रवाशांना अर्धवट सोडले, 16 तासानंतर गाडी हलली, सकाळची एक फेरी रद्द
कर्जत : बातमीदार
माथेरानचा पर्यटन हंगाम लवकरच सुरू होत असून पर्यटन आणि नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन हे जुळलेले समीकरण मिनीट्रेनच्या इंजिनाचा सातत्याने होणार्या बिघाडामुळे अडचणीत येत आहे. 20 एप्रिल रोजी माथेरान येथून 51 पर्यटक प्रवाशांना घेऊन निघालेली मिनीट्रेन बोगद्याजवळ आली असता त्या गाडीचे इंजिन रुळावरून खाली घसरले. रुळावरून खाली उतरलेले इंजिन उचलायला तब्बल 16 तास लागल्याने मिनिट्रेन रात्रभर माथेरानच्या डोंगरात उभी होती. दरम्यान, सायंकाळी पावणे चार वाजता रुळावरून इंजिन उतरलेली गाडी दुसर्या दिवशी सकाळी सव्वा नऊ वाजता तेथून हलली आणि 11.30 वाजता नेरळ रेल्वे स्थानकात पोहचली. दरम्यान, नेरळ येथून माथेरानला जाणार्या मिनिट्रेनची पहिली फेरी रद्द करण्यात आली.
माथेरान येथून 51 पर्यटक प्रवासी यांना घेऊन एनडीएम1-405 हे इंजिन घेऊन निघालेली माथेरान-नेरळ-माथेरान ही फेरी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी माथेरान स्थानकातून निघाली. दुपारी पावणे चार वाजता ही गाडी एनएम 108 येथे आली असता इंजिन रुळावरून खाली उतरल्याने गाडी थांबली. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी यांचे हाल होत असल्याने शेवटी सर्व 51 प्रवाशांना रेल्वे कर्मचारी यांनी तीन किलोमीटर अंतर चालत घाटरस्त्यावर आणून टॅक्सी पकडून दिली. टॅक्सीने सर्व प्रवासी नेरळ येथे रेल्वे स्थानकात पोहचले. मात्र रुळावरून खाली उतरलेले इंजिन पुन्हा रुळावर ठेवण्यासाठी नेरळ लोको येथील कर्मचारी पोहचले. परंतु लोकोमधील तंत्रज्ञ यांना इंजिन रुळावर ठेवण्यात अडचणी येत होत्या. दुपारी पावणे चार वाजता रुळावरून खाली उतरलेले इंजिन रात्री उशिरापर्यंत उचलता आले नाही, त्यामुळे गाडीवर असलेले कर्मचारी, टीसी, गार्ड हे सर्व कर्मचारी रात्रभर थांबून होते.
सकाळी नऊ वाजून 20 मिनिटांनी एनएम 108 येथे अडकून पडलेली मिनीट्रेन पुन्हा पुढील प्रवास करण्यास तयार झाली आणि नेरळकरिता रवाना झाली. मात्र नेरळ-माथेरान-नेरळ हा एकच मार्ग असल्याने नेरळ येथून सकाळी माथेरानकरिता सोडली जाणारी पहिली गाडी रद्द करण्यात आली. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी नेरळ स्थानकात होती, त्यानंतर सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी नेरळ येथून माथेरानकरिता निघालेली पहिली गाडी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल झाली होती. मात्र माथेरान राणीच्या इतिहासात प्रथमच गाडी दुरुस्तीच्या कामासाठी थांबल्यानंतर 16 तास नॅरोगेजवर थांबण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक संपूर्ण रात्र कर्मचारी त्या ठिकाणी जागून थांबले होते, त्यानंतर 16 तासांनी तेथून निघाले, त्या काळात त्यांचा माथेरान स्थानक ते नेरळ स्थानक हा प्रवास 20 तासांहून अधिक वेळेचा होता. दरम्यान, पर्यटन हंगामासाठी सज्ज होत असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ ट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू होत असताना हे रडगाणे अडचणी निर्माण करणारे आहे, अशी भावना पर्यटक व्यक्त करीत आहेत.