पनवेल : बातमीदार
पनवेल पालिका हद्दीत स्थानिक पातळीवर मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या (आरटीपीसीआर) करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. यातील पहिली फिरती प्रयोगशाळा शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाखाली सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून ठाणे येथील मिलेनियम लॅबोरेटरीज आणि पनवेल येथील अॅरोहेड लॅबोरेटरीज या दोनही प्रयोगशाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन अडीच हजार रुपये आकारून ही चाचणी केली जात आहे. यात चाळीसहून अधिक नागरिकांनी प्रयोगशाळेच्या पेटीत ‘स्वॅब’ नमुने तंत्रज्ञांकडे जमा केले आहेत. अनेक नागरिकांनी या फिरत्या प्रयोगशाळेच्या पेटीवर संशय व्यक्त करत येथे स्वॅबचा नमुना देणे योग्य आहे का, अशी विचारणा केली आहे.
पनवेल पालिकेतील नागरिकांच्या मागील दोन महिन्यात 15, 824 चाचणी झाल्या आहेत. मार्च ते मे या कालावधीत 2, 600 जणांच्या चाचण्या झाल्या होत्या. पनवेल पालिका क्षेत्रात सुमारे सात लाखांहून अधिक लोकवस्ती असल्याने नागरिकांच्या चाचणी मोठया संख्येने झाल्यास येथील कोरोनावर मात करता येईल, असे धोरण पालिकेने आखले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) सूचविलेल्या मार्गदर्शन तत्त्वांवर या जागेची उभारणी केल्याची माहिती अॅरोहेड प्रयोगशाळेचे संचालक मंगेश रानवडे यांनी ही माहिती दिली आहे. ही जागा निवडण्यासाठी ठाणे येथील मिलेनीयअम लॅबोरेटरीजच्या शास्त्रज्ञांनी याची निवड केली आहे. अशापद्धतीने सहा विविध ठिकाणी स्वॅबचे नमुने घेण्यासाठी प्रयोगशाळेची पेटी उभारण्यात आल्या आहेत. खारघर येथील प्रयोगशाळेच्या पेटीमध्ये दोन तंत्रज्ञ, एक समन्वयक आणि दोन सुरक्षा रक्षक येथे तैनात करण्यात आले आहेत.