नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची पूर्वतयारी करताना दुसर्या लाटेत जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली रुग्णालये कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. हे करत असताना सर्वसाधारण रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयांचे अधिक सक्षमीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे. याबाबतचे नियोजन आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतीच विशेष बैठक आयोजित करत कोविड व नॉन कोविड वैद्यकीय सुविधांच्या नियोजनाविषयी सविस्तर चर्चा केली. नेरूळ व ऐरोली या रुग्णालयांचे कोविड रुग्णालयामध्ये रुपांतरण करताना सर्वसाधारण रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळताना कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देत आयुक्तांनी या ठिकाणी सद्यस्थितीत दिल्या जात असलेल्या आयपीडी व ओपीडी सेवांची मजलानिहाय सविस्तर माहिती घेतली. सध्या नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय इमारतीत सर्वांत वरच्या सहाव्या व सातव्या मजल्यावर, तसेच ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात पाचव्या व चौथ्या मजल्यावर कोविड रुग्णालयाकरिता आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्स कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर खालील मजल्यांवर सद्यस्थितीत कार्यरत असणार्या आयपीडी व ओपीडी सेवा वरील मजल्यांवर स्थलांतरीत करून तेथे कोविड रुग्णालय रुपांतरणाचे काम सुरू करावे व ते जलद करण्याच्या दृष्टीने कामावर बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय अधीक्षक यांना दिले. याच कालावधीत बेलापूर व तुर्भे येथील माताबाल रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्याची कामेही समांतर सुरू ठेवावीत व ती तत्परतेने पूर्ण करून घेण्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नेरूळ व ऐरोली रुग्णालयाचे कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरण करताना जोपर्यंत त्या ठिकाणी कोविड रुग्ण दाखल होत नाहीत तोपर्यंत सर्वसाधारण रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्याकरिता ही रुग्णालये कार्यरत राहतील असे आयु्क्तांनी स्पष्ट निर्देश दिले. नेरूळ रुग्णालय कोविडमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर बेलापूर माता बाल रुग्णालयातील कोविड पॉझिटिव्ह महिलांची प्रसूतीविषयक वैद्यकीय सुविधा नेरूळ रुग्णालयात स्थलांतरीत करून बेलापूर रुग्णालयामध्ये पूर्णपणे सर्वसाधारण प्रसूती सुविधा उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले, तसेच ऐरोली रुग्णालयामध्ये कोविड उपचार सुविधेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन वेगळ्या भागात नॉन कोविड प्रसूतीपूर्व तपासणी व प्रसूतीपश्चात उपचार सुविधा कायम सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील डायलेसीस सुविधेचे विस्तारीकरण करून नेरूळ रुग्णालयातील डायलेसीस सुविधा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वसाधारण रुग्णांसाठी डायलेसीस सुविधेच्या इतर पर्यायांचाही विचार करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, तसेच वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय सुविधांचे सक्षमीकरण
सद्यस्थितीत सिडको एक्झिबिशन सेंटरमधील 75 आयसीयू बेड्स सुविधेमध्ये 23 व एमजीएम रुग्णालय कामोठे येथील 100 आयसीयू बेड्स कक्षामध्ये 4 रुग्ण दाखल असून भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास नेरूळ व ऐरोली रुग्णालयांमध्ये तीव्र लक्षणे असणारे कोविड रुग्ण दाखल करण्यात येणार आहेत. तोपर्यंत ही रुग्णालये सर्वसाधारण रुग्णांना सेवा पुरविणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली ही दोन्ही रुग्णालये आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्ससह कोविड विरोधी लढ्याकरिता सज्ज होत असून कोविड कालावधीनंतर या रुग्णालयांचा उपयोग दर्जेदार उपचाराकरिता होणार असल्याने याद्वारे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सुविधांचे सक्षमीकरण झाले आहे.