मुरुड : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर या संस्थेने नुकतेच झूमवर ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म‘ हा आहारावरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आहारतज्ज्ञ रंजना तत्ववादी यांनी समतोल आहार व मधुमेही व्यक्तींसाठीचा आहार या विषयावर व्याख्यान दिले, तर आहारतज्ज्ञ डॉ. भक्ती फफे पाटील यांनी हृदयविकार व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी आहार या विषयावर व्याख्यान दिले.
क्लबचे खजिनदार डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी या वेळी रंजना तत्ववादी आणि डॉ. भक्ती फफे पाटील यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये स्थूलपणा, आजारातून उठलेल्या व्यक्तीचा आहार, कावीळ झालेल्या रुग्णांचा आहार, अॅसिडिटी झाल्यास करायचे, आहारातील बदल अशा विविध प्रश्नांवर रंजना तत्ववादी व डॉ. भक्ती फफे पाटील यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी म्हात्रे यांनी केले. हा कार्यक्रम झूमवर दोनशेपेक्षा अधिक लोकांनी पाहिला.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण किरण नाबर या फेसबुक पेजवर केले गेले होते. हा कार्यक्रम यानंतरही किरण नाबर या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, लोकांनी तो जरूर पाहावा, असे आवाहन क्लब तर्फ करण्यात आले आहे.