मुंबई : प्रतिनिधी
कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासासाठी आता मासिक पासबरोबरच तिकीटही मिळणार आहेत, तसेच 18 वर्षांखालील सर्वांना कोणत्याही अटीविना प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल सेवा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयेदेखील सुरू होणार आहेत. त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्यांना कोरोनाविरोधी लस घेण्याची परवानगी नाही अशा व्यक्तींना डॉक्टरच्या मेडिकल सर्टिफिकेट तिकीट खिडकीवर सादर करून तिकीट घेता येईल. तिकीट केवळ तिकीट खिडकीवरूनच उपलब्ध केले जाणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारे तिकीट उपलब्ध होणार नाही.