पनवेल : रामप्रहर वृत्त – दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांचा सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशन मार्फत फिरता दवाखाना हा स्तुत्य उपक्रम रायगडमधील तळोजा येथे ऑक्टोबर 2019 पासून सुरु आहे. या उपक्रमामार्फत तळोजा भागातील सुमारे 22 गावांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. आतापर्यंत साधारणता 6228 रुग्णांची तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात आली आहेत.
लॉकडाऊन असल्या कारणाने रुग्णांना बाहेर गावी उपचारासाठी जाणेही अवघड झाले आहे, अश्या परिस्थितीत लहान मुले, वृद्ध तसेच महिला रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये या फिरत्या दवाखान्यांमार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधे दिली जात आहेत, तसेच कोरोना या रोगाविषयी माहिती दिली जात आहे. जेणेकरून सर्व लोक योग्य ती काळजी घेतील व या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. तसेच लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. या फिरत्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर, नर्स तसेच वैद्यकीय सेवा देणार्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
या वेळी बोलताना पारूल एस. मेहता, संचालक, डीएफपीसीएल आणि ट्रस्टी, ईशान्य फाऊंडेशन म्हणाल्या, डीएफपीसीएल आणि ईशान्य फाऊंडेशन, लोकांसाठी अधिक चांगले आयुष्य निर्माण करण्याचा आणि पर्यायाने समाजात बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. ही मोबाइल क्लिनिकची सेवा म्हणजे आमची सामाजिक बांधिलकी अधिक मजबुत करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. यामुळे लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा थेट त्यांच्या दारात उपलब्ध होत आहे. अशा उपक्रमांसाठी पुढाकार घेणार्या आणि पाठिंबा देणार्या आमच्या कर्मचार्यांना आणि प्रशासनाला यानिमित्ताने मी धन्यवाद देऊ इच्छिते.
तसेच सर्व ग्रामस्तांना आव्हान करते कि, सर्वांनी घरी राहा सुरक्षित राहा विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे. तळोजा एमआयडीसी विभागातील ग्रामीण तसेच निम शहरी भागांना या मोबाइल क्लिनिकचा अशा कठीण परिस्थितीत सेवा देत असून विविध स्तरातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.