Breaking News

महिला अत्याचार आणि बंद मंदिरांविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपतर्फे सोमवार (दि. 12) आणि मंगळवारी (दि. 13) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी आंदोलनाच्या माध्यमातून निष्क्रिय आघाडी सरकारचा निषेध करण्यात येईल. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
मदिरालये उघडण्यास परवानगी देणार्‍या महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास मात्र अजून परवानगी दिलेली नाही. याविरोधात 13 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाईल. भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांबरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत, असे उपाध्ये यांनी सांगितले.
महिला अत्याचारांत वाढ
महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे, मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचाराची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच या असंवेदनशील सरकारविरोधात 12 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या, तर 12 ऑक्टोबरला होणार्‍या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी सांगितले.
कृषी कायद्यांसाठी आनंदोत्सव
याच बरोबर मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ 12 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत, अशी माहितीही उपाध्ये यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply