मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील स्पेशल एनसीबी कोर्टाने आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली. यात शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. 26) सुनावणी ठेवली आहे. गेल्या 17 दिवसांपासून कोठडीत असलेल्या आर्यनची शाहरूख खानने गुरुवारी ऑर्थर रोड कारागृहात जाऊन भेट घेतली. 15 ते 20 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली.
शाहरूखच्या घरी एनसीबीची नोटीस
दरम्यान, एनसीबीची टीम गुरुवारी शाहरूख खानच्या घरी मन्नत बंगल्यावर गेली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एनसीबीने या वेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपास यंत्रणेकडे सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावरही छापा
एनसीबीने बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला. अनन्याच्या घरातून काही वस्तूदेखील ताब्यात घेतल्या आहेत. अनन्याला एनसीबीने समन्स बजावल्याने ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या आर्यन खानची मैत्रीण आहे. अनन्यासोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यनची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहानाही अडकणार असल्याची शक्यता आहे.