मुंबई : प्रतिनिधी
संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना काल एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा, असे म्हटले आहे. यासंदर्भात आता किरीट सोमय्या आपण गोंधळात पडलो आहे, असे म्हणत आहेत.
या प्रकरणावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचे आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावी.
ते पुढे म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीचे प्रशासन आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे. कारण एक परमबीर सिंगही ते शोधू शकले नाहीत. मी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की, त्यांनी आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे कौतुक केले.