औरंगाबाद ः प्रतिनिधी
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केल्याने हा वाद उफाळून आला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकारकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यात काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सांगितले. दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या जीआरवर असलेल्या संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्याचा विरोध केला आहे. निवडणूक आली की हे धंदे सुरू होतात. ज्या अधिकार्याने या जीआरवर सही केली त्यांना बडतर्फ करावे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार शहराचे नाव बदलू शकत नाही. सरकार तुमचे आहे, हिंमत असेल तर करून दाखवा, असा इशाराही जलील यांनी दिला आहे. दरम्यान, यापूर्वीही औरंगाबाद शहराच्या नावावरून मोठा वादंग झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या सीएमओ महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत विरोध दर्शवला होता. महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध आहे, असे ट्विट थोरात यांनी केले होते, तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र येऊन चर्चा केल्यानंतरच एखादा निर्णय घेतात. औरंगाबादच्या नामकरणाबाबतही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली होती.