भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूड या ना त्या कारणासाठी चर्चेत असते. सध्या बॉलीवूड स्टारकीड्सचा कारनामा चर्चेत आहे. हाय-प्रोफाइल क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत एनसीबी अर्थात अमली पदार्थविरोधी विभागाकडून दररोज नवनवीन खुलासे होत असून ड्रग्जचा विळखा मुलांनादेखील पडल्याचे विदारक चित्र समोर आलेले आहे.
बॉलीवूड आणि गॉसिप हे समीकरण जुनेच आहे. या चंदेरी दुनियेत दररोज काही तरी घडत असतं. त्याच्या रंजक व सुरस कहाण्या बाहेर येतात. रील पिक्चरमध्ये नायक-नायकाची भूमिका वठवून वाहवा मिळणार्या या मंडळींचे रियल लाइफ किती वळणावळणांचे असते हे पाहिल्यावर अचंबित व्हायला होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आणि हेच का ते हिरो-हिरोइन ज्यांच्यावर आपण आपला जीव ओवाळून टाकतो, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल. काही जण अय्याशी म्हणून, तर काही ताण-तणाव दूर करण्यासाठी ड्रग्जचा आधार घेतात. वास्तविक ड्रग्ज घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. शिवाय ड्रग्ज शरीरासाठी अपायकारक असते हे माहीत असूनही अनेक बॉलीवूडकर त्याचे नियमित सेवन करीत असल्याचे उजेडात आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने केलेल्या तपासात ड्रग्ज घेणार्या अनेक बड्या तारे-तारकांची नावे समोर आली. यावरून या फिल्मी दुनियेत ड्रग्जचा कसा सर्रास वापर केला जातोय याचा पर्दाफाश झाला. ड्रग्जची ही किड एव्हाना स्टारकिड्सपर्यंतही पोहचली आहे. मुंबई ते गोवादरम्यान निघालेल्या कार्डेलिया क्रूझवर सुरू असलेली ड्रग्ज पार्टी एनसीबीच्या पथकाने उधळली. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानचा चिरंजीव आर्यन खान यालाही रंगेहाथ पकडले गेले. तो सध्या जेलची हवा खात आहे. मुंबईहून गोव्याला चाललेल्या या क्रूझवर हाय-प्रोफाइल ड्रग्ज पार्टी होणार असल्याची खबर एनसीबीला लागली होती. त्यानुसार या पथकाने फिल्मी स्टाईल कारवाई केली. पथकातील लोक प्रवासी म्हणून क्रूझवर चढले आणि पार्टी सुरू होताच त्यांनी धाड टाकली. या छाप्यात कोकेन, चरस, एमडीसारखे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त आढळले. या प्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील आर्यन खानची अटक लक्षवेधी ठरली. आर्यनचे धक्कादायक चॅट्स, संपर्क एनसीबी पथकाला सापडले आहेत. त्याच्या वडिलांनी अर्थात शाहरूखने पुत्राच्या सुटकेसाठी जंग जंग पछाडले, मात्र सबळ पुराव्यांमुळे अजूनपर्यंत तरी त्याला यश आले नाही. आर्यनची चौकशी करीत असताना अभिनेता चंकी पांडेची कन्या अनन्या हिचेही नाव आता ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले आहे. आर्यनसोबतच्या चॅटमध्ये अन्यन्याचे नाव समोर आल्याने तिचीही चौकशी केली जात आहे. आणखी किती स्टारकिड्सची नावे पुढे येतात हे सांगता येत नाही. एवढे मात्र नक्की की ड्रग्जचा विळखा मुलांपर्यंत जाऊन पोहचणे धक्कादायक आहे. मुले म्हणजे उद्याचे देशाचे भवितव्य मानले जाते, पण मुलांची ही तर्हा असेल तर… अर्थात सर्वच मुले बिघडलेली नाहीत. अनेक चांगल्या मार्गाने पुढे जात आहेत, मात्र चित्रपटातून रसिकप्रेक्षकांना सृजनशीलतेचा संदेश देणार्यांची मुलेच जर अशी असतील तर त्यांनी फुकाचा उपदेश करू नये. मुख्य म्हणजे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याला कुणी पाठीशी घालू नये. तपास यंत्रणा आपले काम चोखपणे करीत आहे. त्यांना त्यांचे काम करू द्यावे!