पनवेल : प्रतिनिधी
रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीने पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि.12) या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आली आहे.
रेल्वेची प्रवाशी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्यावर आली असताना 28 ऑक्टोबर रोजी समितीचे चेअरमन खासदार पी. के. कृष्णदास यांच्यासह समितीचे सदस्य कैलाश वर्मा, डॉ. राजेंद्र फडके, उमा रानी, विभा अवस्थी व के. रविचंद्रन यांनी पनवेल स्टेशनला भेट देऊन पाहणी केली होती. पनवेल स्टेशनवरील सर्व फलाटावर फिरून प्रवाशांना तुम्हाला काय सुविधा हव्यात याची चौकशी केली होती. त्यावेळी अॅड. मनोज भुजबळ यांनी साई मंदिर पाडण्यात येऊ नये त्यामुळे कोणताही अडथळा येत नसल्याचे सांगून त्याची पाहणी करण्याची विनंती केली होती.
चेअरमन पी. के. कृष्णदास व सदस्यांनी मंदिराला भेट देताना पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाच्या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे पाहून या रस्त्याचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले होते. रेल्वे प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची सुरुवात केल्याने वाहन चालकांनी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.