Breaking News

घराघरांमध्ये गौराईचे मनोभावे पूजन

पनवेल : बातमीदार

गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर वाजतगाजत जल्लोषात पनवेलच्या घराघरांमध्ये गौरीचे आगमन झाले. माहेरवाशीण असलेल्या गौरीच्या आगमनानंतर घरामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. राज्यात बर्‍याच ठिकाणी उभ्या गौरी बसवण्याची प्रथा आहे. नवीन खण-साडी, बांगड्या, पैंजण, बोरमाळ, चपला हार, नथ, कमरपट्टा, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, चपलाहार असे पारंपरिक दागिने, शेवंतीची वेणी व कुंकू लावून उभ्या गौरीला सजवले जाते. गौरी माहेरवाशीण म्हणून येत असल्याने माहेरी आलेल्या मुलीचे जसे लाड केले जातात तसेच लाड गौरीचे केले जातात. त्यासाठी लाडू-चिवड्याची आरास, पुरणपोळीचा नैवेद्य, हळदी-कुंकू, सवाष्ण जेवण घालून केले जातात. अंगणातील तुळशीजवळ, वड-पिंपळ किंवा औंदुबरासारख्या पवित्र झाडाजवळ गौरीच्या मुखवट्याची पूजाआरती केली गेली. त्यानंतर या ठिकाणाहून जमिनीवर हळदीकुंकवाची पावलांचे ठसे उमटवत गौरी घरात आणल्या.

गौराईचे अलंकार, फळे, हार, गजरे, दूध, वस्त्रमाळा, तोरण, केळीचे पान, मुखवटे खरेदीसाठी शनिवारी सकाळी बाजारात महिलांची झुंबड उडाली होती. ज्या घरी गौरीच्या मूर्ती आणत नाहीत तेथे तेरडयाची रोपे पुजली गेली. त्याशिवाय हिर्‍याच्या व खड्याच्या रूपाने गौरीपूजन केले गेले. प्रदेशानुसार बदलत्या संस्कृतीमध्ये गौरीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी गौरी पाटावर विराजमान होतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या आणि खडयाच्या गौरी असतात. गौरी-गणपतीचा सण मोठया थाटामाटात साजरा केला जात आहे. गौराईच्या आगमनाने खास महिलावर्गात उत्साह असतो. रात्रभर जागरण, गौरीचे गाणे, हळदी-कुंकू समारंभ असे कार्यक्रम आयोजिले जातात. त्यानंतर तिसर्‍या म्हणजे शेवटच्या दिवशी पाणवठ्याच्या ठिकाणी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply