अलिबाग : प्रतिनिधी
सन्मान्य तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचार्यांचा संप सलग दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 9) सुरूच राहिला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या आगारांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळत होता. त्यामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. त्यांनी आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहतूकीकडे वळवला आहे. एसटीच्या रायगड विभागातील सर्व आठही आगारामधील कर्मचारी संपात उतरले असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे या सर्व आगारातून मंगळवारी एकही बस मार्गावर धावली नाही. दररोज कामावर जाणारा नोकरदार वर्ग, ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, ग्रामीण भागात जावून व्यवसाय करणार्या कोळी भगिनी, भाजी विक्रेत्या महिला यांना या संपाचा मोठा फटका बसला आहे. त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपाची पूर्वकल्पना असल्याने मंगळवारी प्रवासी बस स्थानकांकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या बस स्थानकांमध्ये शुकशुकाट होता. मात्र संपामुळे खाजगी वाहतूकदारांचे फावले आहे. ते नेहमीपेक्षा अधिक प्रवास भाडे आकारात असल्याच्या तक्रारी आहेत. अलिबाग ते पनवेल मार्गावरील खाजगी शेअर टॅक्सीचे भाडे 150 रूपये आहे ते आता 200 रूपये आकारले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. मुंबई किंवा पुण्याला जाण्यासाठी साडेचार ते पाच हजार मोजावे लागत आहेत. लोकल भाड्यांमध्येदेखील काहीशी वाढ झाली आहे.
खाजगी वाहतुकीवर आरटीओची नजर
एसटी कर्मचार्यांचा संप न मिटल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी शासनाने खाजगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली आहे. महत्वाचे म्हणजे मालवाहतूक करणार्या वाहनातूनदेखील प्रवासी वाहतूक करता येणार आहे. मात्र त्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारू नये अशी अपेक्षा आहे. खाजगी वाहतूकदारांकडून होणार्या लुटीच्या तक्रारी वाढल्याने त्यांना चाप बसवण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. एसटी महामंडळ, पोलीस आणि आरटीओ यांचे संयुक्त पथक या वाहतूकीवर नजर ठेवून आहे. एखादा वाहतूकदार भरमसाठ भाड्याची मागणी करत असेल तर त्याबाबतची तक्रार आरटीओकडे करता येणार आहे. तक्रारीची शहानिशा करून आरटीओकडून त्यावर कारवाई केली जाणार आहे.
कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, अशी आमची भूमिका आहे. तरीदेखील संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी खाजगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. त्यावर नजर ठेवण्यासाठी एसटी, पोलीस आणि आरटीओ यांची पथके तैनात करण्यात आली आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा कशी मिळेल, असा आमचा प्रयत्न आहे.
-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी रायगड