Breaking News

पालीत प्रवाशांची गैरसोय व खोळंबा

पाली : रामप्रहर वृत्त

एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे दिवाळीची सुट्टी संपून निघालेले प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने सुधागडातील प्रवाशांना मंगळवारी (दि. 9) खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र अनेक खाजगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट करताना दिसत होते. वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अनेक बस थांबे व नाक्यांवर प्रवासी एसटीची वाट बघत तासनतास उभे होते. विशेषत: वृद्ध व महिलांचे खुप हाल झाले. एसटी नसल्याने प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत होता. पाली ते खोपोली फाटा या 30 किमी अंतरासाठी खाजगी वाहने 80 ते 100 रुपये घेत होते. तर खोपोली फाटा ते लोणावळा या अवघ्या 8 ते 9 किमी अंतरासाठी खाजगी वाहने तब्बल 80 रुपये घेत होते. लांब पल्ल्याच्या ठिकाणी तर भरमसाठ पैसे आकारले जात होते. एका महिलेने सांगितले की, गावी जाण्यासाठी वाकण नाक्यावर एसटीची वाट पाहत उभे होते. मात्र तीन तास थांबून एकही एसटी आली नाही. त्यामुळे अधिकचे पैसे देऊन खाजगी वाहनाने गावी पोहोचलो. पैसे तर गेलेच पण गैरसोय देखील झाली. गावागावात जाण्यासाठी अनेकांना मिनीडोअरचा आधार मिळाला. परिणामी खाजगी वाहतूकदारांचा धंदा तेजीत होता.

सुट्टी संपल्याने पालीवरून शिरूरला कामावर जाण्यासाठी निघालो होतो. पालीला तब्बल दोन तासांनी खोपोली फाट्यावर जाण्यासाठी खाजगी वाहन मिळाले. तिथून वाट पाहिल्यावर लोणावळ्यापर्यंत खाजगी वाहन मिळाले. त्यानेही खूप पैसे घेतले. त्यानंतर लोणावळ्याला पीएमटीमध्ये बसून पुढील प्रवास केला. चार तासांच्या प्रवासासाठी तब्बल नऊ तास लागले. वेळ व श्रम तर लागलेच पण गैरसोयदेखील झाली. -संकेत खंडागळे, अभियंता, पाली, ता. सुधागड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply