माणगावमधील गुन्ह्याचे गूढ उकलले
अलिबाग ः प्रतिनिधी
माणगावमधील बालकाचे अपहरण व हत्येमागचे कारण पोलिसांनी तपासाअंती समोर आणले आहे. आपल्या मैत्रिणीशी विवाह करण्यास नातेवाइकांनी विरोध दर्शविल्याने आरोपीने दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी मंगळवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. आरोपी संतोष अशोक यादव मैत्रिणीचीही हत्या करण्याच्या तयारी असताना पोलीस पथकाने त्याला पकडले, असेही दुधे यांनी सांगितले.
माणगाव तालुक्यातील बोर्ले येथील संतोष यादव याने त्याच्या भावाचा दोन वर्षीय मुलगा रूद्र अरुण यादव यास खाऊ देण्यासाठी दुकानात घेऊन जातो असे सांगून गेला तो परतलाच नाही. म्हणून मुलाच्या आईने माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या घटनेत पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (एलसीबी) तपास करण्यास सांगितले. एलसीबीच्या पथकाने आरोपी संतोषच्या मोबाइल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो मुंबईतील एका मित्राच्या संपर्कात असल्याचे आढळेल. म्हणून त्याच्या मित्राकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने रूद्रला जीवे मारून रोहा हद्दीत टाकून दिल्याचे सांगितले तसेच तो त्याची गुजरातमधील सिल्वासा येथे राहणार्या मैत्रिणीबाबत विचारपूस करीत असल्याचे समजले. त्यानंतर त्याचा शोध घेत एलसीबीचे पथक सिल्वासा येथे गेले. संतोष त्याची मैत्रिण राहत असलेल्या इमारतीजवळ आला असता, त्याला या पथकाने अटक केली.