महाड : प्रतिनिधी
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ पीक आणि भात पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकर्यांना विम्याची रक्कम आणि शासकीय नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी संघटनेचे सुदन शेलार, सुनील गोठल उपस्थित होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील आंबा, काजू आदी फळपीक आणि भातपीक उत्पादन करणार्या शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे महसूल, कृषी विभागामार्फत संयुक्तरित्या करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांमध्ये महाड तालुक्यात 570 फळ पीक उत्पादकांचा समावेश आहे. यातील काजू उत्पादकांना लाभ दिला असून अद्याप आंबा उत्पादक शेतकरी वंचित असल्याचे देशमुख यांनी सांगितले. ज्या कंपनीने फळ पिकांना विमा संरक्षण दिले होते, त्या बजाज अलायन्झ कंपनीच्या प्रतिनिधींनी येत्या दोन दिवसात पैसे जमा होतील, असे सांगितले होते, त्याला दोन महिने उलटून गेले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारचा निधी कंपनीकडे जमा झाला असल्याचे शासन दरबारी सांगण्यात येते, मग विमा कंपन्या शेतकर्यांना लाभ देण्यात विलंब का करतात, असा सवाल देशमुख यांनी या वेळी उपस्थित केला. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात जवळपास 1400 शेतकर्यांचे नुकसान झाले. यातील 918 शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळाली मात्र अद्याप उर्वरित शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. या शेतकर्यांना शासकीय कार्यालयात बँक खाते अपडेट नाही, कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशी कारणे देत चालढकल केली जात आहे, असे देशमुख यांनी सांगितले. येत्या चार दिवसात वंचित नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई आणि विमा संरक्षण लाभ मिळाला नाही तर महाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा तुकाराम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.