18 महिन्यांनंतर ट्रॅकवर उतरून जिंकले सुवर्ण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताची स्टार धावपटू हिमा दास ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिने पहिल्याच स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्राप्री 2च्या महिला गटात तिने हे यश मिळवले. द्युती चंद हिनेही 100 मीटर शर्यतीत 11.44 सेकंदांची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या अमोज जेकबने पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत वर्चस्व राखले.
आसामची धावपटू हिमा दासने 23.21 सेकंदांची वेळ नोंदवली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ती बराच काळ ट्रॅकपासून दूर होती. हिमाने सुवर्णपदक जिंकले असले तरी तिला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची 22.80 सेकंदांची पात्रता वेळ गाठता आली नाही. 2018च्या जागतिक कनिष्ठ 400 मीटर शर्यतीत तिने 50.79 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर एप्रिल 2019मध्ये तिला दुखापत झाली आणि तिने फक्त 100 व 200 मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. 200 मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरने 24.91 सेकंदांची वेळ नोंदवली.
महिलांच्या 100 मीटर शर्यतीत द्युतीने 11.44 सेकंदांची वेळ नोंदवली. कर्नाटकच्या धनेश्वरीने 11.89 सेकंदांच्या वेळेसह दुसरे, तर महाराष्ट्राच्या डिंड्रा डुडली व्हाल्लाडॅरेसने 11.92 सेकंदांच्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत अमोज जेकबने 46.00 सेकंदांची वेळ नोंदवली.