आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी?
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. अशाच काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावर भूमिकेत असताना आता नवी मुंबई महापालिकका निवडणुकीतही एक चलो रे या भूमिकेत काँग्रेस आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाचे आम्ही अंमलबजावणी करणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी तसेच जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यातले चार नगरसेवक गणेश नाईक यांच्याकडे गेले. त्यामुळे काँग्रेसकडे फक्त सहा नगरसेवक राहिले असून तरी काँग्रेस स्वबळावर लढवण्याची तयारी करताना दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असून सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी असावी असे काँग्रेसला वाटत आहे. काँग्रेस शिवसेनेवर दबाव टाकून अधिकाधिक जागा कशा मिळतील याची रणनीती काँग्रेसने आतापासून आखली असून त्यामुळे स्वबळावर लढणार, असा संदेश देण्याकरीता काँग्रेसची भूमिका दिसून येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्यामुळे शिवसेनेची ताकद नवी मुंबई शहरामध्ये अधिक असल्यामुळे त्यामुळे शिवसेना आपल्यामित्र पक्षाला अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देणार नसल्याची भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी आतापासूनच घेतल्याची दिसून येत आहे. काँग्रेस स्वबळावर भूमिका घेत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. जो काँग्रेस निर्णय घेईल तो महाविकास आघाडीला मान्य असेल आणि त्यांना त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी नमूद केले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आतापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाड झाल्यास अर्थात भाजपला गणेश नाईकांना फायदा होईल. ही निवडणुक प्रभाग पद्धतीने होणार असून त्यामुळे अपक्षांची डाळ शिजणार नाही असेही वाटत आहे.