राज्यातील 105 ठिकाणी 21 डिसेंबरला मतदान
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली.
मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021मध्ये मुदत संपणार्या 18, तसेच नवनिर्मित सहा अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर रोजी सुटी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30पर्यंत असेल, तर 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर आणि नवनिर्मित पाली नगरपंचायतीचा समावेश आहे. विविध जिल्ह्यांतील सात नगर परिषदा, नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.