नवी मुंबई : प्रतिनिधी
सानपाडा येथील लायब्ररी करिता देण्यात येणारा भूखंड हस्तांतरण करार लवकरच होणार आहे. या लायब्ररीसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबई शहरात सुसज्ज लायब्ररी होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी आग्रोळी-बेलापूर येथे बुधवारी (दि. 24) पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व वाचकांना विविध क्षेत्रातील वाचनसाहित्य उपलब्ध व्हावे याकरिता सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त मध्यवर्ती लायब्ररी उभारावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनास सातत्याने केली होती. सिडको प्रशासनाकडूनही भूखंड मिळणेकरिता वेळोवेळी आमदार म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. याच अनुषंगाने सिडको प्रशासनाने सानपाडा सेक्टर 11 येथील नियोजित लायब्ररी करिता 1766 चौमी क्षेत्रफळ असलेला भूखंड क्र. 1 हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून महापालिका व सिडको यांमध्ये जागा हस्तांतरण करार लवकरच करण्यात येणार आहे. वर्षभरात सानपाडा येथे लायब्ररी सुरू होणार असून एमपीएससी व यूपीएससी परीक्षा देणार्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच लायब्ररीमध्ये अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व वाचकांना त्याचा फायदा होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी सांगितले.