उरण : प्रतिनिधी
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्याने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. उरणमधील शेतकर्यांच्या रब्बी पिकांवरही अवकाळीचे संकट कोसळल्याने त्यांनीही शासनाकडून भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहेे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिके घेणार्या शेतकर्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. शेतकर्यांनी पेरणी केलेली वाल, चवळी, मूग, हरभरा ही पिके शेतात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने पूर्ण कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चिरनेर येथील कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी तहसीलदारांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
भातपिकाच्या कापणीनंतर चिरनेर, कळंबुसरे विभागातील शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करतात. त्यामध्ये मुख्यत्वे वाल, चवळी, मूग, हरभरा ही पिके घेतली जातात. अनेक शेतकरी टोकन पद्धतीने या पिकांची पेरणी करतात तर काहीजण ट्रॅक्टरने या पिकांची पेरणी करतात. हिवाळ्यातील थंडीत पडणार्या दवाच्या पाण्यावर ही पिके तयार होऊन शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते. यावर्षी सुमारे 70 ते 80 हेक्टर जमिनीत शेतकर्यांनी या पिकांची पेरणी केली होती.
1 व 2 डिसेंबरला अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पिकांची पेरणी केलेल्या शेतांमध्ये पाणी या पिकांचे बियाणे रुजण्यापूर्वीच कुजून गेले आहे. अगोदर लांबलेल्या पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान शेतकर्यांना सोसावे लागले आहे. त्यानंतर हमखास उत्पन्न देणारी व कमिखर्चात पिकणारी वाल, चवळी,मूग अशी पिके कुजून गेल्याने शेतकरी पार उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकर्यांना योग्य ती शासकीय नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी चिरनेर येथील कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी उरणच्या तहसीलदारांकडे पत्राद्वारे केली आहे.
बदलते ऋतूचक्र शेतीसाठी धोकादायक
मागील वर्षभरापासून ऋतूचक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी उन्हाळ्यात पाऊस, तर कधी पावसाळ्यात कडक उन्ह तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी वातावरणातील परिस्थिती व हवामान बदल वर्षभरात अनुभवले. अवकाळी पावसामुळे े हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यामुळे राज्य शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा चिंताग्रस्त शेतकरी राजा करीत आहे.