पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह संपादित जमिनीची नुकसानभरपाई आणि अन्य मागण्यासंदर्भात पुष्पकनगर येथील गणेश मंदिरात लोकनेते दि. बा. पाटील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोविरोधात एल्गार करीत येत्या 13 जानेवारीला भूमिपूत्र निर्धार परिषद आयोजित केल्याची माहिती देण्यात आली. सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू केली, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह संपादित जमिनीचे नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न, पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रक्रियेतील प्रश्न व इतर प्रश्न सिडकोने अद्यापपर्यंत सोडविलेले नाहीत. त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या इतरही अनेक प्रलंबित मागण्या सिडकोकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी 27 गाव कृती समितीच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर चिंचपाडा, कोपर, उलवे, तरघर, कोंबडभुजे, वाघिवली वाडा, वाघीवली, वरचे ओवळे, खालचे ओवळे, कोल्ही, पारगाव, दापोली, डुंगी या गावाच्या घरांच्या व शेतांच्या जमिनीवर उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्प उभारणीत सिडको ही नोडल एजन्सी असून विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे काम सिडकोच्या अखत्यारीत आहे. सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू करून घरांचे व पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असताना काही प्रकल्पग्रस्तांची घरे जबरदस्तीने जमीनदोस्त केली. प्रकल्पग्रस्तांनी घरे मोडून पुनर्वसन क्षेत्रात घरे बांधण्याकरीता सुरुवात केली असता सिडको पुनर्वसन क्षेत्रामध्ये सोयी सुविधा पुरविण्यास सिडको असमर्थता दर्शवित आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत घरे खाली होत नव्हती तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास रस असलेले सिडको प्रशासन आता घरे खाली केल्यानंतर प्रश्न सोडविण्यास नकारात्मकता दर्शवित आहे. या पत्रकार परिषदेला 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, खजिनदार संतोष पवार, उपाध्यक्ष गोवर्धन डाऊर, सी. टी. पाटील, करण भोईर, अॅड. प्रशांत भोईर, सचिव प्रेम पाटील, सहसचिव किरण केणी, चेतन डाऊर, सहखजिनदार कैलास तारेकर, कायदेशीर सल्लागार अॅड. राहुल मोकल, अॅड. प्रदीप मुंडकर, सल्लागार पुंडलिक म्हात्रे, जयवंत परदेशी, गजानन पाटील, विष्णू जितेकर, प्रवक्ते रुपेश धुमाळ, संपर्कप्रमुख किरण पवार, माहिती प्रसारण सुनील कटेकर, उमेश खांदेकर, आरटीआय सेल सचिन कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
परिस्थितीनुसार पुढील आंदोलनाबाबत विचार
सिडकोने कामे अगदी जोमाने सुरू केली असली तरीही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात सिडको टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नाईलाजास्तव आंदोलन करणे भाग पडत आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा सिडकोच्या या अत्याराचाराच्या निषेधार्थ येत्या 13 जानेवारीला लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या अध्यक्षतेखाली भूमिपुत्र निर्धार परिषद तसेच दुसरा टप्पा सिडकोचे लक्ष वेधण्यासाठी 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात सुरू असलेली कामे बंद करण्याचे ठरविलेले आहे. त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील आंदोलनाबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.