अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील शाळांची घंटा येत्या सोमवार (दि. 31) पासून वाजणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शाळा सुरू करण्याला मान्यता दिली असून तसे आदेश जारी केले आहेत. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला. त्यानुसार अनेक भागातील शाळा 24 जानेवारीपासून सुरूदेखील झाल्या. मात्र रायगड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्गातही उत्सुकता होती. रायगड जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक 28 जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती 31 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास टास्कफोर्सने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले असून तसे परीपत्रक जारी केले आहे. जिल्हाभरातील शाळा सुरू होणार असल्या तरी पनवेल महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने अनुमती दिलेली नाही. पनवेल परिसरात अद्याप कोरोना रुग्णांची संख्या मोठी असून त्यात नव्याने भर पडत आहे. आजच्या घडीला पनवेलमध्ये चार हजार 10 रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज 200 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे.
मुलांचे लसीकरण जोरात : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 76 हजार 96 मुलामुलींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्यापुर्वी शाळेत कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करून घ्याव्यात तसेच 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.